Blog
बुरशीच्या रोगांमुळे दरवर्षी पिकांचे भरपूर नुकसान होते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशके वापरतो. ही बुरशीनाशके कशी वापरावी याबाबतीत आज माहिती घेऊया. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुरशीचा रोग दिसण्या आगोदर फवारणी करायला हवी. बुरशीचे नियंत्रण करायला जी औषधे वापरतात त्यांना बुरशीनाशके म्हणतात. या बुरशीनाशकांची आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असे मुख्य प्रकार आहेत. आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे जी औषधे झाडाच्या अंगात भिनून संपूर्ण झाड विषारी बनवतात. यांचा फायदा हा आहे की ज्या ठिकाणी फवारा पोहोचू शकत नाही त्या ठिकाणाची रोगकारक बुरशी देखील औषधाच्या संपर्कात येते. पण आंतरप्रवाही बुरशीनाशकाची तोटे हे आहेत की ते बऱ्याचदा हळूहळू झाडात भिनते आणि वेळेत संपूर्ण रोग नियंत्रित होत नाही. आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या अतिवापराने बुरशींमध्ये त्याला पचवायची क्षमता तयार होते. कितीही फवारले तरी त्या बुरशीनाशकांचा म्हणावा तसा रिझल्ट येत नाही. हे टाळण्यासाठी एक फवारा आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा आणि दुसरा स्पर्शविष प्रकारच्या बुरशीनाशकाचा करावा. बुरशीनाशकांचा अतिवापर करू नये. स्पर्शजन्य बुरशीनाशके म्हणजे ज्यांचा बुरशीला स्पर्श झाल्यावरच काम करतात ते औषधे. रोगनियंत्रणासाठी या बुरशीनाशकांचा स्पर्श रोगकारक बुरशीला होणे आवश्यक आहे. म्हणून ह्या प्रकारच्या औषधांना फवारणी करतांना संपूर्ण झाड भिजेल याची काळजी घ्यावी. रोग झालेल्या ठिकाणी औषध पोहिचने आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या प्रतीचा स्प्रेडर वापरावा. याव्यतिरिक्त ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारखे जैविक बुरशीनाशके उपलब्ध आहे. ही बुरशीनाशके म्हणजे जिवंत सक्रिय घटक. तो मातीत जिवंत राहू शकतो आणि वाढूही शकतो. पण जमिनीत ते जास्त परिणामकारक पद्धतीने काम करतात. पानांवर फवारल्यावर त्यांचा रिझल्टचा कालावधी मर्यादित असतो. या जैविक बुरशीनाशकांचा रिझल्ट रसायनांपेक्षा उशिरा येतो. पण ते रसायनांपेक्षा फार सुरक्षित आहेत. याव्यतिरिक्त औषधी वनस्पतीचे अर्कदेखील बुरशीनाशक म्हणून वापरतात. टनटनी अर्क, निम तेल यासारख्या उहोतो. त्पादनांचा हर्बल बुरशीनाशक म्हणून उपयोग. आता बुरशीनाशके कधी वापरावी हा प्रश्न पडतो. पिकांमध्ये बुरशीजन्य रोगाचा हंगाम असतो पावसाळा. बुरशीच्या रोगासाठी पानावरचा ओलावा आणि दमट हवामान पूरक असते. त्यामुळे जास्त आद्रता असलेल्या मोसमात बुरशीनाशकांचा फवारा कमी अंतराने फवारवा. कोरड्या वातावरणात दोन फवाऱ्यातील अंतर वाढवलं तरी चालेल. हा निर्णय शेतात रोगाची तीव्रता पाहून ठरवा. पाऊस येण्याअगोदर बुरशीनाशकांचा फवारा करावा. पावसा आगोदर बुरशीनाशकांचा फवारा सुकायला हवा म्हणजे तो धुतला जाणार नाही. बऱ्याच प्रॉडक्ट आधीच मध्ये स्टिकर टाकलेले असते. त्यामुळे त्यांचा फवारा धुतला जात नाही. बुरशीनाशके फवारतांना कोणता स्प्रे पंप वापरवा असा प्रश्न विचारला जातो. यासाठी आपला पंप किती बारीक थेम्ब बनवतो आणि तो झाडाला संपूर्ण भिजवतो का हे पाहणे आवश्यक आहे. झाडाच्या सर्वांगावर फवारा पोहोचेल अश्या पद्धतीने बुरशीनाशक फवारले गेले पाहिजे. पावर पंपासारखे स्प्रे पिकाला चांगल्या पद्धतीने भिजवतात. हे झाले पाने फांद्या आणि खोडासाठी. म्हणजे जमिनीच्या वरील भागासाठी. पण काही बुरशीचे रोग मुळात, जमिनीखाली असतात. त्यांना कसं नियंत्रित करायचं? फ्युजारीयम सारखे रोग मुळाला संसर्ग करतात. त्यामुळे मुळात बुरशीनाशक टाकणे आवश्यक असते. पानांवर, खोडावर बुरशीची लागण झालेली असल्यास आपल्याला दिसते आणि त्यावर नेमका फवारा मारता येतो. पण जमिनीत झालेला रोग म्हणजे, द्रुष्टीआडची सृष्टी. रोगग्रस्त मुळापर्यंत, औषध पोहोचवणं म्हणजे कठीण काम. त्यासाठी ड्रेंचिंग करणे आवश्यक आहे. ड्रेंचिंग करतांना खोल जमिनीत मुळापर्यंत पोहोचेल एवढे पाणी टाकणे आवश्यक आहे. यासाठी ड्रेंचिंग म्हणजे आळवणी करावी लागते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बुरशीनाशकाची द्रावण मुळात झिरपले अश्या पद्धतीने टाकायचं. ज्यांच्या कडे ड्रीप आहे ते ड्रीपच्या माध्यमातून ड्रेंचिंग करतात. पण ज्यांच्याकडे ड्रीप नाही ते ग्लासातून हाताने औषध टाकतात किंवा स्प्रे पंपाचा नोझल काढून, पंपाने औषध मुळाशी टाकतात. काही जण पाटाच्या पाण्यातून औषध टाकतात. पण ही पद्धत शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही. यामध्ये सगळ्या शेताला बुरशीनाशक पाजलं जातं आणि हेवे असलेले जीवदेखील मारतात. बऱ्याचदा आपण तीर्थ शिंपडल्यासारखं ड्रेंचिंग करतो. पण ते तीर्थ, बुरशीची लागण झालेल्या मुळापर्यंत पोहोचेलच याची शाश्वती नाही. झाडाची मुळे किती खोल आहेत आणि त्यांपर्यंत औषध पोहिचवण्यासाठी किती पाणी वापरावे लागेल याचा अंदाज घेऊन पाणी वापरावे. यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत त्याची माहिती भविष्यातील लेखात घेऊया. ड्रेंचिंग साठी बुरशीनाशक पाण्यात विरघडणारे असणे आवश्यक आहे. औषध मुळाशी पडते याची खात्री करा. जमीन सुपीक असेल आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तर बुरशीनाशक मुळापर्यंत लवकर झिरपते आणि जमीन चांगली ओली होते. मातीशी बुरशीनाशकाची रिअक्शन होऊन त्याची परिणामकारकता कमी होऊ शकते. त्यासाठी जमिनीचा सामू मापात असावा. तो अति जास्त किंवा कमी नसावा. मुळांमध्ये ड्रेंचिंग पद्धतीने वापरलेल्या बुरशीनाशकाचे रिझल्ट हे, फवारणी पेक्षा उशिरा येतात. कारण ते आगोदर मुळांमध्ये शोषले जाते, त्यानंतर ते झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवले जाते. थोडक्यात लांबचा फेरा घेऊन बुरशीनाशकाची बस मुळांमार्गे रोग झालेल्या भागा पर्यंत पोहोचते. ड्रेंचिंग करतांना मातीत थोडा ओलावा असावा. त्यामुळे बुरशीनाशकांचा रिझल्ट वाढतो. कोरड्याठणठणीत जमिनीत ड्रेंचिंग करू नये. ड्रेंचिंग मध्ये वापरले जाणारे बुरशीनाशके जास्तकरून आंतरप्रवाही असतात. त्यामुळे बुरशीला, रसायन पचवायची ताकद येते. बुरशीच्या रोगांचे नियंत्रण करतांना वरील माहिती आपल्याला निश्चितच उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. ………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:- https://www.amazon.in/Dreamers-Doers-Dr
-
मातीतील ओलावा टिकवा !Oct 12, 2023
-
कृषिरसायनांचे ‘स्कॉर्चिंग’ कसे टाळावेOct 04, 2023
-
कीटकनाशकांचा रिझल्ट कसा ओळखावा?Sep 28, 2023