Blog

कंबोडियाची शाही नांगरणी

माझी कंबोडियाची बाईक राईड जोरात सुरु आहे. इथल्या खेड्यापाड्यात फिरतांना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान लोकांमध्ये जागोजागी जाणवतो. त्याचबरोबर व्हिएतनाम युद्धाची अमेरिकन झळ आणि स्वदेशी कुपुत्र पोलपॉट ने दिलेला घाव लोकांच्या आठवणीत ताजा आहे याची जाणीव होते. पण फक्त हे दोनच झटके त्यांच्या देशाला बसले असं नाहीत. कंबोडियाचा ताबा पोलपॉटच्या खमीर रूज कडे आल्यावर त्यांनी लोकांवर अत्याचार केले. पण दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं व्हिएतनामने कंबोडियावर आक्रमण करत काही किलोमीटर देश बळकावला. मग पोलपॉटच्या खमेर रूज आर्मीने त्यांना शह देत मागे ढकललं आणि हरलेली जमीन परत मिळवली. ‘आता थांबू नका, व्हिएतनामला धडा शिकवा’ असं म्हणत पोल पॉट ने आपल्या सैन्याला व्हिएतनाममध्ये प्रवेश करायला लावला. प्रत्युत्तरादाखल व्हिएतनामदेखील पूर्ण ताकदीनिशी युद्धात उतरला आणि त्यांनी संपूर्ण कंबोडिया जिंकून घेतला. तिथं नवीन सरकार स्थापन केलं. पोलपॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांना थाईलँडमध्ये आश्रय घ्यावा लागला. क्रूरकर्मांना मदत करणाऱ्या चीनने पोल पॉट ची मदत केली. मग त्यांनी चीनची मदत घेऊन थाईलँडमधून लढाई सुरु ठेवली. पुढे युनो ने पुढाकार घेतला. चीनने शिष्टाई केली. व्हिएतनामची आर्मी कंबोडियातून एकदाची गेली आणि राजेशाहीआधारित लोकशाही कंबोडियात आली. पोलपॉटचं पुढे काय झालं हा प्रश आपल्याला पडला असेलच. त्याला जन्मठेप झाली. पुढे तो जेलमध्येच हार्ट अटॅकने मेला. काहीजण म्हणतात कि त्याने औषधाच्या जास्त गोळ्या खाऊन आत्महत्त्या केली. ते काहीही असो पण  पोलपॉट आणि खमेर रूज च्या राहू केतू पासून कंबोडियाची सुटका झाली. स्वतंत्र कंबोडियाने मग आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करायला सुरवात केली.  शेतीव्यवसायावर सरकारने भर दिला. शेतीशी निगडित एक पारंपरिक उत्सव इथं साजरा होतो. तो म्हणजे शाही नांगरणी उत्सव. मे महिन्याच्या सुरवातीला, पाऊस येण्याअगोदर हा सण साजरा केला जातो. पावसाळ्यातील भातलागवडीचा हंगाम सुरु होण्याची ही नांदी असते. खमेर राजवटीचा सर्वात महत्वाचा शाही उत्सव म्हणून या सोहळ्याला मानतात. शाही नांगरटीचा सण दरवर्षी साजरा होतो. या सणात राजाच्या हस्ते भाताचा हंगाम सुरु केला जातो. या वर्षी पिकांचं किती उत्पन्न येईल ह्याचा अंदाज इथं वर्तवला जातो. या सणाला खमेर भाषेत ‘प्रीह रीच पिथी चराट प्रेह नेऍनगकोऍल’ असं लांबलचक नाव आहे. कंबोडियातली ही प्रथा पहिल्या ते सहाव्या दशकादरम्यानच्या फुआन राजवटीपासून चालू आहे. शाही नांगरटीचा हा सोहळा पाहण्यासारखा असतो. राजा किंवा राजघराण्यातील वंशज, सजवलेल्या पालखीतून येतो. ती नक्षीदार पालखी सहा जण खांद्यावर वाहून आणतात. पालखीमागे लांब बांबूला बांधलेलं छत्र राजाच्या डोक्यावर धरत एक जण चालत असतो. पारंपारिक कंबोडियन वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक येते. उत्सवस्थळावर कंबोडियन शेतकरी आगोदरच राजाची वाट पाहत थांबलेले असतात. दोन गुबगुबीत बैल पाठीवर नक्षीदार नांगर घेऊन नांगरटीसाठी तयार असतात. मग राजा दोर हातात घेऊन नांगरायाला सुरवात करतो. राजाच्या डोक्यावर छत्र धरत नोकर चालतात. मागे राणी, नक्षीदार भांड्यातून बिया टाकत राजाला सोबत करते. राणीच्या बरोबरच्या दासी कलशात बियाणं घेऊन एका रांगेत चालतात. असा हा लवाजमा तीन फेऱ्या मारून थांबतो. या फेकलेल्या बिया गोळा करायला लोकांची झुंबड उडते. या बियानां इथं पवित्र मानलं जात. त्यानंतर महत्वाच्या गोष्टीला सुरवात होते. ती म्हणजे पिकपाण्याचा अंदाज वर्तवणे. सात सोनेरी भांड्यात तांदूळ, मका, तीळ, डाळी, गवत, पाणी आणि तांदळापासून बनवलेली दारू असे पदार्थ मांडून ठेवलेले असतात. नांगरट संपल्यावर बैलांना या भांड्यांसमोर मोकळे सोडले जाते. बैल ज्या पदार्थाला आगोदर तोंड लावेल त्या पिकासासाठी येणारा हंगाम चांगला असेल असं मानलं जात. यावरून त्यावर्षीच्या हवामानाचा अंदाजदेखील बांधला जातो. बैल दारूला तोंड लावतो का? हा प्रश आजही डोक्यात झोकांड्या खातोय. हा उत्सव पाहण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दक्षिण कंबोडियाच्या अंगकोर बोरोई इथंल्या मंदिरात सहाव्या शतकातला नांगराने नांगरणारा बालरामाचा पुतळा सापडलाय. पंधराशे वर्षांपासून शेतीसोहळ्याची साक्ष देत हा कृष्णबंधू उभा आहे. हा पुतळा शाही नांगरटीच्या सोहळ्याचं प्रतीक म्हणून प्रदर्शित केला जातो. तसा या सणाला हजारो वर्षांपूर्वीच्या रामायणाचा संदर्भ आहे. राजा जनक नांगरत असतांना जमिनीतून सीता बाहेर आली. तेव्हापासून हा सण सुरु झाला असं इथं म्हणतात. फार पूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी बांधिलकी ठेवणाऱ्या कंबोडियामध्ये हा सण आपल्या देशातून गेला हे ऐकून छान वाटलं. कंबोडिया व्यतिरिक्त बऱ्याच अशियन देशात हा नांगरटी सण साजरा केला जातो. म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशात इंग्रज येण्याअगोदर १८८५ पर्यंत हा सण साजरा केला जात होता. ब्रह्मदेशात हा उत्सव पाचव्या शतकात पागान राजवटीत सुरु झाला. ब्रह्मदेशात सर्वच राजांनी हा उत्सव साजरा केला असं नाही. काही राजांच्या कालखंडात या प्रथेला खंड पडला. पण पुढच्या राजांनी ही प्रथा परत सुरु केली. सोनेरी आणि चंदेरी झूल अंगावर टाकलेले पांढरे बैल नांगराला जुंपलेले असतात. पुढे राजा आणि त्यामागे राणी नांगरातील निघतात. त्यांच्यामागे मंत्रिगणांचा ताफा निघतो. नांगरट सुरु असतांना ब्राह्मण मंत्रघोषात १५ हिंदू देवतांना आहुती देतात. त्यानंतर ३७ पवित्र आत्म्यांना आवाहन केलं जातं. या वर्षी पाऊसपाणी चांगला होवो आणि पिकं चांगली येवोत म्हणून हा सण ब्रह्मदेशात साजरा करतात. शेजारी थाईलँडमध्ये देखील हा सण साजरा केला जातो. थाईलँडमध्ये ही प्रथा सुखोथाई राजवटीपासून सुरु आहे. इथं नांगराटीच्या उत्सवाची प्रथा कंबोडियातून आली असं म्हणतात. १३ व्या शतकाच्या मध्यात खमेर राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर थाईलँडमध्ये हि प्रथा सुरु झाली. थाई भाषेत याला ‘राएक ना ख्वान’ असं म्हणतात. याचा शब्दशः अर्थ ‘भात लागवडीचा शुभ मुहूर्त’ असा होतो. मोंगकूट राजाने बुद्धिष्ठ आणि हिंदू सणांना एकत्र करून एकत्रित साजरे करायला सुरवात केली. बुद्धिष्ठ विधी आगोदर राजवाड्यात होतो, त्यानंतर राजवाड्यासमोरच्या पटांगणात हिंदू पद्धतीने नांगरटीचा सोहळा पार पडतो. १९२० मध्ये राजा राम- सातवा यांनी हा सोहळा खंडित केला होता पण १९६० मध्ये राजा राम-९ वा ‘भूमिबोल अदुलयादेज’ यांनी तो परत सुरु केला. इथं शाही नांगरटीच्या सणाच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. शेतीसणाच्या दिवशी संपूर्ण देशाला सुट्टी देणाऱ्या देशात शेतीला किती महत्व आहे हे यावरून स्पष्ट होतं. नांगरट करत असलेल्या जमिनीत, अमेरिकेने टाकलेले आणि न फुटलेले बॉम्ब सापडत असतील का? असा प्रश्न सकाळच्या उन्हात चमकून गेला. चांगल्या हंगामा साठी नांगरटी करणारा कंबोडियन राजा पाहून मला सोन्याच्या नांगराने नांगरनारा मराठी जानता राजा आठवला.जय शिवाजी म्हणत मी बाईकला किक मारली. ………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.